मुंबई: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले असताना आता महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्येच या प्रकरणावरून जुंपल्याचे दिसत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी या प्रकरणातील फरार आरोपी स्वतःहून आत्मसमर्पण करत असतील, तर गृहखाते काय झोप काढत आहे का? असा सवाल करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मुंडे पाठीशी घालत असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी धस यांनी लावून धरली आहे. परभणीतील सभेतून ‘अजितदादा… क्या हुआ तेरा वादा?’ असा सवाल करत धस यांनी पवार यांना डिवचले होते.
पवार यांच्यावरील ही टीका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ट्विट करत देशमुख हत्या प्रकरणात धस हे जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. बीड प्रकरणातील आरोपी स्वतः हून आत्मसमर्पण करत आहेत, मग गृहखाते झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? असे सवाल केले आहेत. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही धस यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी धस यांना आवरावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून महायुतीतील नेत्यांमध्येच चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे.