Navi Mumbai : नवी मुंबई : नवी मुंबईतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील पालकांची चिंता वाढली आहे. नवी मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एखादी टोळी सक्रीय झाल्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. मुलं गायब होत असल्याने पालकांसह पोलीसही हादरून गेले आहेत.
मागील 48 तासात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. मुले अचानक बेपत्ता होत असल्यामुळे पालक चिंतीत झाले आहेत. गायब झालेली ही सहाही मुले 12 ते 15 वयोगटाची आहेत या पालकांनी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दिली आहे. नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली आदी परिसरातील ही मुले असून याच परिसरातून ही मुले गायब झाली आहेत.
ही सर्व मुले 3 आणि 4 डिसेंबर रोजी गायब झाली आहेत. गायब झालेल्या मुलांपैकी काही मुलं शाळेत गेल्यावर गायब झाली. कुणी मित्राच्या घरी कार्यक्रमाला तर कुणी वाढदिवसाला गेलेले असताना गायब झाली आहेत. रबाळेतील एक मुलगा तर सार्वजनिक शौचालयात गेला होता. तिथून तो गायब झाला आहे. एक मुलगा कौपरखैरणेमधून गायब झाला होता. दुसरा 12 वर्षाचा एक मुलगाही असाच बेपत्ता झाला होता. नंतर तो ठाणे रेल्वे स्टेशनवर सापडला. मुलं अशी अचानक गायब झाल्याने पालक चांगलेच हादरले आहेत. मुलांचं अपहरण करून त्यांचं काही बरंवाईट तर झालं नाही ना? अशी शंका पालक व्यक्त करत आहेत. मात्र मुलं अशी अचानक बेपत्ता होत असल्याने नवी मुंबईत भीतीचे वातावरण पसरले आहे.