लोणी काळभोर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते सोलापूर या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची अतिक्रमणे पुढील सात दिवसांत काढून घ्या. अन्यथा अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी अतिक्रमणधारकांना दिला आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. या महामार्गाच्या हद्दीमध्ये 8 किमी ते 252.350 किमी म्हणजे हडपसर ते सोलापूर या दरम्यान लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पर्यायाने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. तर, वारंवार कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. तसेच या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही संजय कदम यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याच्या बाजूला नातेवाईक, भाडेकरू, मित्रमंडळी यांना टपरी, हातगाडी लावण्यास संबंधित घरमालक व स्थानिक पुढारी व गावकारभाऱ्यांनी आपआपल्या सोयीनुसार परवानगी दिली आहे. राजकारणी व संबंधित घरमालकांचे खतपाणी मिळत असल्याने बिनधास्तपणे अतिक्रमण झाले.
अतिक्रमणधारकांना राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद
अतिक्रमणधारकांना स्थानिक राजकीय पुढारी, गावकारभारी व त्यांच्या बगलबच्च्यांचा पाठिंबा असल्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कारवाईकडे पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अतिक्रमणाने ग्रासले रस्ते..!
पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यापारी व व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. यामध्ये हडपसर, १५ नंबर शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन चौक, लोणी कॉर्नर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनमधील एलाईट चौक, तळवडी चौक व कासुर्डी टोलनाका या ठिकाणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यापैकी सुमारे ७० टक्के अतिक्रमणामुळे रस्त्यातील वाहतुकीला आडकाठी होत आहे.
अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार कारवाईचा खर्च
पुणे-सोलापूर महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे, बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासित करण्यात येतील. या कारवाईचा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येणार आहे. एखाद्या अतिक्रमणधारकाने खर्च देण्यास नकार दिल्यास तो खर्च संबंधितांच्या सातबारावर चढविला जाणार आहे. तर या मोहीमेला विरोध केल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई केली जाणार असल्याचेही ‘एनएचएआय’ने सांगितले.
पुणे-सोलापूर महामार्ग मोकळा श्वास घेणार का?
पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या सेवा रस्ताच नव्हे तर मुख्य रस्त्यावरही दुकानदारांनी अतिक्रमणे केल्याचे दिसून येत आहे. या अतिक्रमणांना स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व स्थानिक नेते यांचे पाठबळ असल्याने या ठिकाणच्या चौकांची अवस्था अतिशय गंभीर बनली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला टपरीचालक, फळेविक्रेते, हातगाडी, दुचाकी, रिक्षा यांनी अतिक्रमणे केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
फक्त एकदा कारवाई नको, तर सातत्य हवे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जरी संबंधित अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करणार असले, तरी त्याचा कितपत फायदा होईल. याबद्दल नागरिकांच्या मनात शंका आहे. कारण, मागच्या वर्षीच्या कारवाईचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे फक्त एकदा कारवाई करून भागणार नाही, असे नागरिकांना वाटत आहे.