ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना (Naresh Mhaske) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे गटाने पत्रक जारी करुन दिली आहे.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/XYJjTUy0r8
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघावर भाजपचा डोळा होता. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हा मतदारसंघ आपणच लढावा यासाठी खूप प्रयत्न केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाणे मतदरासंघासाठी जोर लावला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे हा मतदारसंघ स्वत:कडे कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपने आपला दावा करत इच्छुकांची यादीही पुढे केली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने हा मतदारसंघ आपला असल्याने त्यांनीही जागा सोडण्यास नकार दिला.
ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांचा सामना महाविकास आघाडीच्या राजन विचारे यांच्यासोबत होणार आहे. राजन विचारे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यात बंडात राजन विचारे यांनी त्यांना साथ दिली नाही. ते उद्धव ठाकरे गटातच राहिले.
कल्याणमध्येही उमेदवारी जाहीर होण्याआधी शिवसेना-भाजपामध्ये अंतर्गत मतभेद दिसून आले. पण अखेर ही जागा शिवसेनेला मिळाली. इथून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे रिंगणात आहेत, त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्याशी आहे. मविआमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे आहे.