Nandurbar : देशात पुष्करनंतर सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेडा यात्रेला यंदा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. अवघ्या तीन दिवसांत 145 घोड्यांची विक्री झाली असून सुमारे 67 लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती चेतक फेस्टिव्हलचे आयोजक जयपालसिंग रावल यांनी दिली. या वर्षी आतापर्यंत 3 हजारांहून अधिक घोडे बाजारात दाखल झालेत. पुढील काही दिवसांत हा आकडा साडेतीन हजारांच्या पुढं जाणार असं दिसतंय. पंजाब, काठेवाडी, मारवाडी अशा दमदार जातींचे घोडे मोठ्या संख्येने येत आहेत. देशभरातून व्यापारी, खरेदीदार आणि घोड्यांचे शौकीन याठिकाणी गर्दी करत आहेत. (nandurbar)

यंदा तब्बल साडेपाच कोटींची उलाढाल?
याठिकाणी दिसत असलेल्या उत्साहावरून आणि विक्रीच्या वेगावरून यंदा अश्व बाजाराची उलाढाल थेट साडेपाच कोटींच्या पुढे जाईल, असा अंदाज रावल यांनी व्यक्त केला. दररोज मोठमोठे व्यवहार होत असून, अनेक वर्षांनंतरचा हा सर्वात गजबजलेला हंगाम ठरणार असल्याचं ते म्हणाले.
नवे विक्रम होण्याची शक्यता
सारंगखेडा ही परंपरागत घोडेविक्रीसाठी प्रसिद्ध यात्रा. उत्तम दर्जाच्या अश्वांमुळे आणि या बाजाराची ऐतिहासिक ओळख असल्यामुळे दरवर्षी इथं प्रचंड गर्दी होतेच. पण यंदा मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे विक्रीत नवे विक्रम होतील असं जाणकार सांगत आहेत.
आमदाराच्या मुलाचं अश्वप्रेम चर्चेत
यावेळी एक खास घटना सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचा मुलगा आदित्य कुल यांनी या बाजारातून तब्बल 11,11,111 रुपये देऊन नुकरा जातीची घोडी विकत घेतली आहे. नुकरा ही अत्यंत प्रतिष्ठित, दुर्मिळ आणि महागडी जात. उंच, सडपातळ, देखणी आणि रुबाबदार अशा शरीरयष्टीसाठी ही जात प्रसिद्ध आहे. अशा घोड्यांच्या किमती तर थेट लाखातून कोटींपर्यंत जातात. दमदार बांधा आणि उत्तम स्वभावामुळे ही जात शौकिनांच्या यादीत वरच आहे.






