बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टाकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तुरुंगात 24 तास मदतनीसाची मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्या आजारपणाचे कारण देत ही मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्यासाठी मदतनीस कोण असावा, याचे नावही कोर्टाला सांगितले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड तुरुंगात आहे. देशमुखांची हत्या करणारे आरोपी कराडशी संबंधित असून त्यामुळे कराडच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. सीआयडीने वाल्मिक कराडचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याची बँक खाती गोठवण्यात आली. तर, संपत्ती जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अखेर वाल्मिक कराडने स्वत: हून पुण्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे.
मी गंभीर आजारी, जीवाला गंभीर धोका…
वाल्मिक कराडने कोर्टाला केलेल्या विनंतीत म्हटले आहे की, आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असून या आजारासाठी ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावा, अशी विनंती वाल्मिक कराडकडून करण्यात आली आहे. वाल्मिक कराडने रोहित कांबळे या मदतनीसाची मागणी केली आहे.
कोण आहे रोहित कांबळे?
वाल्मिक कराडने रोहित कांबळेच मदतनीस का हवा, याचे कारणही कोर्टाला दिले आहे. मशीन वापरण्यासाठी रोहीत कांबळेने प्रशिक्षण घेतले असून मशीन चुकीच्या पध्दतीने लावल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही कराड याने म्हटले आहे.