पुणे: पुणे महापालिकेच्या झाडकाम विभागातील कंत्राटी कामगारांचा राजकीय नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या झाडकामासाठी नेमलेले ५०० पेक्षा अधिक कामगार रस्त्यावर काम करण्याऐवजी खासगी बंगल्यांवर घरगडी म्हणून गुलामगिरी करत आहेत, असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जनतेच्या पैशातून खासगी घरगडी?
कुंभार यांनी ट्विटद्वारे सांगितले की, हे कामगार शहराच्या रस्त्यांवर झाडू मारून स्वच्छता राखण्याऐवजी काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिक कामांसाठी वापरले जात आहेत. या कामगारांना महापालिकेकडून वेतन देण्यात येते, म्हणजेच त्यांचा पगार थेट नागरिकांच्या कररुपी पैशांतून केला जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती जनतेच्या पैशांची खुलेआम लूट असल्याचे कुंभार यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणात संपूर्ण चौकशी करून जबाबदारांची नावे जाहीर करण्याची आणि संबंधितांकडून पगाराची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे.

१० हजारांपैकी फक्त अर्धेच रस्त्यावर
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, झाडकाम विभागात एकूण १०,२२० कामगार कार्यरत आहेत. मात्र यापैकी केवळ ५,४०६ कामगार प्रत्यक्षात रस्त्यावर काम करताना दिसतात. उर्वरित कामगारांना झाडकामाऐवजी अतिक्रमण हटवणे, सांडपाणी व्यवस्थापन, फ्लेक्स हटवणे यांसारख्या इतर विभागांमध्ये तैनात करण्यात आले आहे. त्यातही मोठा हिस्सा अशा कामगारांचा आहे जे सरळसरळ राजकीय नेते व अधिकाऱ्यांच्या घरी काम करत असल्याचे उघड झाले आहे.
एका माजी नगरसेविकेचा दबाव
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एका माजी नगरसेविकेच्या घरी काम करण्यास नकार दिल्यामुळे एका कामगाराला कामावरून कमी करून त्याला घरी पाठवण्यात आले, असेही उघड झाले आहे. काही माजी नगरसेवकांच्या घरी तर जवळपास १५ कामगार काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून प्रशासन व राजकीय मंडळींच्या संगनमताचे स्पष्ट संकेत मिळतात.
१४७ कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह
महापालिकेने नुकतीच १४७ कोटी रुपयांची झाडकामासाठी निविदा काढली होती. मात्र, ही निविदा वादग्रस्त ठरल्याने रद्द करण्यात आली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून झाडकामासाठी कंत्राटी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर दुसरीकडे आधीच कार्यरत असलेले कामगार स्वच्छता काम न करता वैयक्तिक कामांमध्ये गुंतलेले आहेत.
या सर्व प्रकारामुळे शहरात झाडकाम व्यवस्थित होत नाही, रस्त्यांवरील कचरा वेळेवर उचलला जात नाही, परिणामी संपूर्ण शहरात अस्वच्छतेचे व दुषित आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रशासकीय नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







