पुणे : थकीत मिळकतकर वसुलीसाठी पालिकेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. थकबाकीदार मिळकतदारांच्या मिळकतींचे नळजोड तोडण्यात येणार आहेत. या कारवाईसाठी परिमंडलनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही मोहीम नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे.
महापालिकेकडून वाढीसाठी उत्पन्न- शहरातील थकबाकीदारांच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. दोन डिसेंबरपासून थकित मिळकतकर वसुलीवर भर देण्यात आला आहे. कर वसुलीसाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत थकबाकीदारांच्या घरासमोर बँडवादन केले जात आहे. तसेच दररोज थकबाकी असलेल्या निवासी, व्यावसायिक मिळकतींना भेट देऊन जप्तीची कारवाई केली जात आहे.
आतापर्यंत या पथकांनी ७१ कोटी ४१ लाख ८५ हजार ३९३ रुपयांचा थकित कर वसूल केला आहे. महापालिकेतर्फे एक एप्रिलपासून मिळकतकराची देयके पाठवली जातात. आर्थिक वर्ष संपण्यास आता केवळ तीन महिने उरले आहेत. मात्र, अद्यापही काही नागरिक, व्यावसायिकांचा मिळकतकर भरण्याकडे कल दिसून येत नाही. त्यामुळे आता नळजोड तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.
एक जानेवारीपासून मध्यवर्ती वसुली पथकांसोबत एक प्लंबर व तीन बिगारी, विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक यांच्या पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकतींचे नळजोड तोडण्यात येतील. थकबाकीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच त्यांच्या मिळकतींचे नळजोड पूर्ववत केले जातील. त्यामुळे मिळकतकराची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी त्वरित थकबाकी भरावी, असे आवाहन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.