सोलापूर : मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ ही घटना घडली आहे. दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेस सी -११ डब्यातील काच फुटली असून सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, दगडफेक कोणत्या कारणाने करण्यात आली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी (क्रमांक २२२२५) मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या’ वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसवर गुरुवारी (दि.२) रोजी रात्री ९. २० वाजता जेऊर कुईवाडी सेक्शनमधील भाळवणी स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली.
यामध्ये कोच क्रमांक सी-११ मधील सीट क्रमांक २ आणि ३ च्या खिडकीच्या काचा फुटल्या असून या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नाही. दगडफेकीची घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आता रेल्वे सुरक्षा बल सतर्क झाले असून, यावर कोणता ठोस निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेवर सीएसएमटी- शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परंतु, मुंबई-सोलापूर सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २) रोजी रात्री सोलापूरच्या वंदे भारत ट्रेन जेऊर स्थानकातून पुढे निघताच दगडफेकीची घटना घडली. यामध्ये गाडीची काच फुटली आहे. मात्र, सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी दगडफेक करणाऱ्यांचा रेल्वे पोलीसांकडून शोध घेतला जात आहे.