पुणे : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरुन उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारीला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम असल्याने दुपारी 12 ते 2 या वेळेत महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद राहील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे.
यापूर्वीही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेकदा असे ब्लॉक घेण्यात आले आहे. अनेकदा ब्लॉक घेऊन ही कामे करण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येकवेळी दोन तासांचाच ब्लॉक घेण्यात येतो. मात्र काम लवकरात लवकर संपवण्याकडे कल असतो.
त्यामुळे वाहनाधारकांनी पर्यायी मार्गाने प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे पुलावरुन सर्व प्रकारची वाहने जुना मुंबई -पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. तसेच जुना पुणे ते मुंबई मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळवलं आहे.
काय आहे ITMS सिस्टिम?
आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39 ठिकाणी तब्बल 370 विविध कॅमेरे तैनात असतील. या प्रकल्पासाठी 340 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.