Mumbai News : मुंबई : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून महामार्गावर सातत्याने वाहनांचे अपघात होत आहेत. बुलढाणा, सिंदखेडराजा, नाशिक, जालन्यादरम्यान समृद्धी महामार्गावर आतापर्यंत हजारो अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सिंदखेडराजा नजीक झालेल्या भीषण अपघातात २६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. आजही समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. वाढत्या अपघातांची मालिका पाहता राज्य सरकारने यासाठी ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलणार
समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या महामार्गावर लवकरच एअर अॅम्बुलन्स सेवा करणार सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे. (Mumbai News ) अपघात झाल्यानंतर अपघातस्थळी तत्काळ मदत पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत मिळावी, यासाठी एअर अॅम्बुलन्सची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणे सुरू केल्याची माहिती दिली. हेलिकॉप्टर कंपनीशी करार झाल्यानंतर समृद्धी महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना हेलिकॉप्टरने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. (Mumbai News ) याशिवाय राज्यातील काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध रुग्णालयांसोबतही राज्य सरकारकडून करार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सातत्याने समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास खाली उतरण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. महामार्गाला कुंपण असल्याने अपघातानंतर स्थानिकांना मदतीसाठी महामार्गावर येता येत नाही. (Mumbai News ) परिणामी अपघातानंतर जखमींचा घटनास्थळीच मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महामार्गावर ब्रेक पॉईंट नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
समृद्धी महामार्गावरील या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने महामार्गावर एअर अॅम्बुलन्सची सेवा उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जखमींना तत्काळ रुग्णालयात सोडणे शक्य होणार आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर आज पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २० जण जखमी झाले आहेत. रात्रीच्या सुमारास खुराणा ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर गेट नंबर १६ वर हा अपघात झाला.