मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, त्याअंतर्गत १३ नद्यांवर आणि अनेक महामार्गावर पूल बांधले जात आहेत. अनेक रेल्वे रूळ सात स्टील आणि प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पुलांद्वारे ओलांडले जातील, अशी माहिती भारतीय रेल्वेने आपल्या वार्षिक आढाव्यात दिली आहे. SHRIRE या प्रकल्पांतर्गत २४३ किमीपेक्षां जास्त पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, ३५२ किमीचे पिअर काम आणि ३६२ किमीचे पिअर फाऊंडेशनचे कामही पूर्ण झाले आहे.
गुजरातमध्ये ट्रॅक बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. आनंद, वडोदरा, सुरत आणि नवसारी जिल्ह्यात आरसी ट्रॅक बेडचे बांधकाम सुरू आहे. अंदाजे ७१ किमी आरसी ट्रॅक बेडचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि व्हायाडक्टवर रेल्वे वेल्डिंग सुरू झाले आहे, असे वार्षिक आढाव्यामध्ये म्हटले आहे. महाराष्ट्रातील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनसाठी पहिला काँक्रीट बेस स्लॅब ३२ मीटर खोलीवर यशस्वीरीत्या टाकण्यात आला असून तो १० मजली इमारतीच्या समतुल्य आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळ फाटादरम्यान २१ किमी लांबीच्या बोगद्यावर काम सुरू आहे.
यामध्ये मुख्य बोगद्याचे बांधकाम सुलभ करण्यासाठी ३९४ मीटर इंटरमीडिएट बोगदा पूर्ण झाला आहे. पालघर जिल्ह्यात न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरून सात बोगद्यांचे बांधकाम सुरू आहे. गुजरातमधील एकमेव माऊंटन बोगदा यापूर्वीच यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. थीम-आधारित घटक आणि ऊर्जा-कार्यक्षम वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेल्या या कॉरिडॉरवरील १२ स्थानके निमार्णाधीन असल्याचे पुनरावलोकनात म्हटले आहे.
ही वापरकर्ता अनुकूल आणि ऊर्जा-सकारात्मक स्थानके टिकाऊपणाला प्राधान्य ठेवून जागतिक दर्जाचा प्रवासी अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. याशिवाय २०३० पर्यंत निव्वळ शून्य कार्बनचे लक्ष्य रेल्वेने ठेवले आहे. नोव्हेंबर २०२४ पर्यंत सुमारे ४८७ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प आणि सुमारे १०३ मेगावॉटचे पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याचे आढाव्यामध्ये म्हटले आहे. दरम्यान, १०३ किमी लांबीच्या व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूंना २ लाखांहून अधिक ध्वनी अडथळे बसवून प्रकल्पाअंतर्गत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.