गणेश सुळ / केडगाव : दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या मुळा – मुठा व भिमा नदी पात्रात जलपर्णी वाढल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलत नदी जलपर्णी मुक्त करावी, अशी मागणी स्थानिक नागरिंकाकडून केली जात आहे. दोन्हीं नद्यांचे पात्र हिरवेगार झाले आहे.
या मोठया प्रमाणावर वाढलेल्या जलपर्णीमुळे मुळा – मुठा व भीमाचा जणू श्वासच गुदमरत असल्याचे दिसून येत आहे. नदीकाठी मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते, तर नदीकाठच्या गावांना डासांचा मोठा उपद्रव सहन करावा लागत आहे. परिसरात चिलटे, माशा, डास वाढल्याने आजुबाजुला रोगराईत वाढ झाली आहे.
सरकारने स्वच्छतेवर भर दिला असताना येथील नागरिकांच्या आरोग्य समस्येकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील नागरिकांमध्ये साथीचे आजार पसरू लागले आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याने संबंधित यंत्रणेने लवकरात – लवकर नदीतील जलपर्णी काढावी, अशी मागणी नदीकाठच्या रहिवाशांकडून केली जात आहे.
नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर डास वाढले असून मलेरिया चिकन गुनियाचे पेशंट वाढत आहेत. तरी संबंधित विभागाकडून या नदिकाठच्या परिसरात फवारणी करण्यात यावी व प्रशासनाने गांभिर्याने तात्काळ उपाय योजना कराव्यात.
गोपाळ शेलार – स्थानीक रहिवासी