योगेश मारणे / न्हावरे : शिरूर तालुक्यातील घोड धरण परिसरातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर आज (दि.२९) सायंकाळी सुमारे १४ तासांच्या प्रतीक्षेनंतर शिरूरच्या महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई केली. कारवाईमध्ये सुमारे आठ ब्रास वाळू व दोन हायवा ट्रक जप्त केले आहेत.
चिंचणी-गुनाट (ता. शिरूर) रस्त्यावर वाळू वाहतूक करताना पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, कारवाईसाठी पोलीस व महसूल विभागाला सुमारे १४ तासांपेक्षा जास्त कालावधी लागला याचीच चर्चा सर्वत्र होती. तसेच शिरूर तालुक्यात दिवस-रात्र नदीपात्रात हैदोस घालून नद्यांचे वाळवंट करणाऱ्या मुजोर वाळू माफियांना नेमका कोणाचा राजकीय वरदहस्त आहे. याचीच चर्चा जोरदार सुरू होती. त्यामुळे पोलीस व महसूल विभाग यांचा वचक विधानसभा निवडणुकीनंतर संपला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
घटनेची संविस्तर माहिती अशी की, शनिवारी (दि.२८) गुनाट (ता. शिरूर) परिसरात गुनाट-चिंचणी रस्ता येथे दोन अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा ट्रक नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पकडले. परंतु, वाळू माफीयांनी काल (दि.२८) रात्री दहा ते आज दुपारी अडीच वाजेपर्यंत वाळूने भरलेल्या हायवा ट्रकच्या चाव्या दिल्या नसल्यामुळे पोलीस गाडी व हायवा ट्रक तसेच रस्त्यात उभे होते.
त्यामुळे शिरूर तालुक्यात वाळू चोरांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली असून, वाळू माफियांनी वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबाव आणल्यामुळे वाळू माफियांनी हायवा ट्रक रखडून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पोलीस व महसूल प्रशासन यांना मुजोर वाळू माफियांचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी संबंधितांवर पुढील करवाई करण्यात येणार असून, त्याची सुनावणी होणार आहे.