ढाका: बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपल्या सल्लागार परिषदेचे खातेवाटप जाहीर केले. युनूस यांनी संरक्षण मंत्रालयासह २७ मंत्रालयांचा प्रभार स्वतःकडे ठेवला आहे. परराष्ट्र सेवेतील अनुभवी मुत्सद्दी मोहम्मद तौहीद हुसैन यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल एम सखावत हुसैन यांना गृहमंत्रालयाचा प्रभार सोपवण्यात आला आहे.
युनूस यांनी गुरुवारी हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली होती. हे पद पंतप्रधान पदाच्या समतुल्य आहे. या हंगामी सरकारमध्ये एकूण १५ जणांचा समावेश आहे. हसीना सरकारविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेच्या दोन युवा नेत्यांचा देखील सरकारमध्ये समावेश करण्यात आला आहे. एम नाहीद इस्लाम या विद्यार्थी नेत्याला दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान, तर आसिफ महमूदला युवक व क्रीडा मंत्रालय देण्यात आले आहे. युनूस यांनी आपल्या सरकारमध्ये मानवाधिकार, सामाजिक, पर्यावरण कार्यकर्त्यांना प्रामुख्याने स्थान दिले आहे.