पुणे: एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी चालक वाहकांकरिता १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी सध्या आगारात चालविण्यात येणाऱ्या कामगार कर्तव्यांसाठी उद्दिष्टे निश्चित
करण्यात आली आहेत.
या योजनेत कामगार कर्तव्याचे १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीसाठी उद्दिष्ट निश्चित करताना प्रथम त्या कामगार कर्तव्यामधील प्रत्येक फेरीचा ‘मूळ आकडा’ निश्चित करताना प्रथम जानेवारी २०२४ महिन्याचे सर्व दिवसांचे निव्वळ वाहतूक उत्पन्न (वाहकाने विक्री केलेल्या तिकिटांचे उत्पन्न) विचारात घेण्यात यावे, अशा सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच संपूर्ण महिन्यात प्राप्त झालेल्या उत्पन्नाची उतरत्या क्रमाने मांडणी करून उच्चतम प्रथम सात आकडे निश्चित करत या सात आकड्यांची सरासरी येणारा अंक हा त्या फेरीच्या उत्पन्नाचे उहिष्ट असेल. याप्रमाणे एका कामगार कर्तव्यात अंतर्भूत असलेल्या सर्व फेऱ्यांच्या उदिष्टांची बेरीज करून त्या कामगार कर्तव्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येईल, असे एसटी महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, निश्चित करण्यात आलेल्या कामगार कर्तव्याची आगार लेखाकार व सहाय्यक चाहतूक अधीक्षक यांनी तपासणी करावी, तर विभागीयस्तरावर विभागीय वाहतूक अधिकारी, लेखा अधिकारी/विभागीय लेखा अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी यांनी आगारामार्फत निश्चित करण्यात आलेल्या उदिष्टांची तपासणी करावी, असे महामंडळाने नमूद केले आहे. यासोबत जर एखादा कर्मचारी कर्तव्य प्रोत्साहन भत्ता योजना कालावधीत नव्याने सुरू करण्यात आले/येणार असेल व त्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी मागील वर्षीचे उत्पन्न अथवा नजीकच्या महिन्यातील उत्पन्न याचा तपशील उपलब्ध नसल्यास त्या कामगार कर्तव्यासाठी सदर फेरीचे ६० भारमानाइतके उत्पन्न (विनासवलत) उद्दिष्ट महणून निश्चित करण्यात येईल.
तसेच ज्या सेवांवर चालक/वाहक बदल देण्यात येतो, त्यांच्याबाबतीत प्रत्येक चालक/वाहक जोडीने ज्या कि.मी. प्रवासाची कामगिरी केली असेल, ती कामगिरी विचारात घेऊन त्या जोडीसाठी वाहतूक उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात यावे, कामगार कर्तव्याकरिता देण्यात आलेल्या उद्दिष्टांपेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देय राहील. सदरची रक्कम संबंधित चालक/वाहकांस समप्रमाणात (प्रत्येकी १०) कर्तव्य संपल्यानंतर आगारात हिशेब देतेवेळी रोखीने अदा करण्यात येईल.