नांदेड : नांदेडचे काँग्रेस खासदार नेते वसंत चव्हाण यांचे आज सोमवारी पहाटे तीन वाजता निधन झाले आहे. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 14 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मृत्यू समयी ते 70 वर्षाचे होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज दुपारी तीन वाजता त्यांचे पार्थिवदेह नायगाव येथे आणले जाणार आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे.
तब्बल 24 वर्ष सरपंच, एक वेळेस विधान परिषद सदस्य, दोन वेळेस विधानसभा आमदार ते आता खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. 15 ऑगस्ट 1954 रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाले. 1987 साली ते नायगावचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 24 वर्ष ते या पदावर होते. 1990 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 2002 मध्ये राष्ट्रवादी पक्षकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. 2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये कॉंग्रेसकडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.
नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली. तत्कालिन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता.