अतुल जगताप
वडूज : वडूज येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था असतानाही वडूज ग्रामपंचायत व नुतन नगरपंचायतीच्या वतीने गेली आठ वर्षे मुस्लिम कबरस्थान नजिक कचरा टाकून प्रदूषण केले जात आहे. यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. आणि येथील कचरा डेपो न हलविल्यास कचऱ्याच्या घंटा गाडीचेच दहन करणार आहे. असा कडक इशारा मुस्लिम समाजाने प्रशासनाला दिला आहे.
वडूज नगरीतील मळ्याची शेजारी १९८० ते १९८२ या कालावधीत मुख्यमंत्री पदी बॅरिस्टर ए. आर. अंतुले असताना वडूज नगरीत मुस्लिम समाज कबरस्थानची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी मोकळे माळ असल्याने या भागाला गायरान अशीच ओळख होती. त्याच्या शेजारी लिंगायत समाज्याची दफनभूमी आहे. याठिकाणी आतापर्यंत सुमारे एक हजार अंत्यविधी पार पडले आहेत. सध्या याच परिसरात वडूज नगरीतील ओला व सुका कचरा गोळा करून याठिकाणी डंपिंग ग्राउंड करण्यात आले आहे. त्यामुळे वादळ वारा व भटक्या प्राण्यांच्या मुळे परिसरात कचऱ्याची दुर्गंधी पसरवित आहे.
दरम्यान, याठिकाणी अंत्यविधीला आलेल्या नातेवाईक व मित्र परिवार तसेच ग्रामस्थांच्या या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने हा कचरा जाळला जातो. त्याच्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत आहे.
खारवळ मळा येथील नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. वडूज नगरीत मुस्लिम समाजातील एक ही नगरसेवक-नगरसेविका नसल्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब निषेधार्थ ठरली आहे. सदर जागेचे पावित्र्य न राखल्याने मुस्लिम समाज्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.अशी माहिती देण्यात आली आहे. तत्कालीन वडूज ग्रामपंचायत सदस्य-सरपंच-उपसरपंच यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने आता या ‘पाली’च्या समस्यांचा ‘डायनोसर’ बनला आहे.
या कचऱ्याची वर्गवारी केली जात नाही. त्यामुळे जैविक कचऱ्याने रोगराई पसरत आहे. भविष्यात येथे कोणी सक्तीने कचरा टाकण्याचा प्रयत्न केला तर सदरची कचरा घंटा गाडी पेटवून देण्याचा तसेच तेथील कचरा नगर पंचायत कार्यालयासमोर टाकण्यात येईल.त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा ही इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वडूज नगरीची उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांच्या दालनात माजी नगराध्यक्ष डॉ महेश गुरव, परेश जाधव, इम्रान बागवान, भरत घनवट,प्रतिक बडेकर,जावेद मनोरे, फिरोज आत्तार, सज्जाद शेख, सिकंदर मुल्ला,बरकत मुल्ला,काका बनसोडे,सॊमनाथ जाधव, लहुराज काळे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, इम्तियाज बागवान, अमीन मुल्ला,नगरपंचायत अधिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच मुस्लिम समाजातील प्रमुख उपस्थित होते
दरम्यान, वडूज नगरीच्या कचऱ्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी गेली वर्षभरात तीन लाख साठ हजार रुपये भाडे पट्टा देण्यात येत आहे. मोकळ्या जागेत कोणतीही वीज पुरवठा, संरक्षक भिंत नसल्याची माहिती काही जाणकार लोकांनी दिली आहे. त्याची ही चांगलीच चर्चा होत आहे.