भोर : भोर येथील किल्ले विचित्रगडाला ‘झुंज’ या सामाजिक संस्थेच्या ५० हून अधिक गिर्यारोहकांनी काल शनिवारी (ता.१७) भेट दिली आहे.
भोर येथील मराठा इतिहासातील एक त्यंत महत्वाच्या किल्ला म्हणजे विचित्रगड होय. या किल्ल्याचा इतिहास, कोयाजी बांदल समाधी व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे महात्म्य नागरिकांना समजले पाहिजे. यासाठी ‘झुंज’ या सामाजिक संस्थेने या मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेंतर्गत झुंज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भोर गावात जाऊन गिर्यारोहकांसाठी नाष्टा तयार केला. किल्ले विचित्रगडावर जाण्यासाठी ९ गिर्यारोहकांचे ५ गट तयार केले. आणि प्रत्येक गटाला एका नदीचे नाव दिले होते. त्यानंतर सर्वांना ट्रेकवर जाण्यासाठी सूचना दिल्या.
गिर्यारोहकांनी किल्ल्यावर गेल्यावर, झुंज संस्थेचे सहसंस्थापक व ट्रेक लीडर सुश्रुत किंगे व ऋतुराज काळे यांनी किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्वाच्या विषयी दाखले दिले. झुंजचे अध्यक्ष मल्हार पांडे व उपाध्यक्ष सौरभ जगताप यांनी झुंज चे ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचे कार्य, त्याचे महत्व, गड किल्ल्यांची निगा राखण्याची गरज व इतर गोष्टींवर भर देत विविध मुद्दे आलेल्या लोकांसमोर मांडले. तर झुंजचे संपर्क प्रमुख, ऐश्वर्य केंदळे, पूजा बडेकर, व्यवस्थापन प्रमुख विक्रम टिळेकर व वैष्णवी कुंभार या सर्वांनी आलेल्या लोकांसोबत योग्य समन्वय साधून हा ट्रेक सुखरूपपणे पार पाडला.
दरम्यान, या मोहिमेतील शेवटची जागा म्हणजे कोयाजी बांदल समाधी. या समाधी जवळ आल्यानंतर सर्वांना या समाधीची झालेली दुरावस्था आढळून आली. कोयाजी बांदल यांच्या समाधीची डागडुजी करायची आहे. हि वास्तू पुन्हा ऐतिहासिक प्रेमींसाठी अर्पण करायची आहे. अशी मदतरुपी घोषणा झुंजचे अध्यक्ष मल्हार पांडे यांनी केली आहे.
झुंज ही संस्था गेली कित्येक वर्षे ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी कार्य करत आहे. संस्था दर महिन्याला एक ट्रेक व एक स्वछता मोहीम आयोजित करीत आहे. संस्थेने त्या अनुशंघाने भोर येथील किल्ले विचित्रगडाला भेट दिली आहे. मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्वांना सर्टिफिकेट देण्यात आली. बाल गिर्यारोहक यशदिप वेदपाठक, ऋतुजा वेदपठाक, जिजा वाईकर व शौर्य कदम या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली.