पुणे : लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात उद्या, शुक्रवारी (दि. १० मे) सायंकाळी ६ वाजता आयोजित केल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या ↑ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर, किशोर शिंदे, गणेश सातपुते, हेमंत संभूस, अजय शिंदे, योगेश खैरे, जयराज लांडगे, बाळा शेडगे उपस्थित होते.
नांदगावकर म्हणाले, मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जण काम करीत आहोत. सभेला उच्चांकी गर्दी होईल, असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि आढावा घेतला. वाहतुकीची कोंडी होणार नाही, यासाठी प्रयत्न करीत आहोत.