बापू मुळीक
सासवड : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाच माजी मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दिपक केसरकर, राजेंद्र गावित यांच्यासह विजय शिवतारे यांचा समावेश आहे. त्यानंतर नाराज झालेल्या शिवतारे यांनी पक्ष नेतृत्वावर टीकेची जोड उठवली. तसेच आता नाही ,तर कधीच नाही, असा कित्ता गिरवत त्यांनी अडीच वर्षानंतरही मंत्रीपद नको ,असा इशारा सुद्धा दिला. अशातच शिवतारेंच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या झोपड्या तोडल्याचा गंभीर आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच आंदोलनही केले आहे. यादरम्यान शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरण्यात आली आहे. त्यामुळे शिवतारे यांच्यासमोर नवं संकट उभ राहण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरातील संबंधित जागाही आमदार विजय शिवतारे यांच्या ताब्यात आहे. पण, या ठिकाणी असलेली घरे, झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. येथे वास्तव्याला असलेल्या झोपडीधारकांकडून फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. मोबदला न देता फसवणूक केल्याचा झोपडीधाराकांचा आरोप आहे.
अंधेरी विजय शिवतारे बिल्डर हाय हायच्या घोषणांनी दणाणून सोडले आहे. शिवतारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, गरीबांच्या झोपड्यावर जेसीबी फिरवल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पण झोपडीधारक एमआयडीसी पोलीस ठाण्यात आमदार विजय शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही आहेत. एकीकडे मंत्री पदाची संधी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या शिवतारेंच्या विरोधात झोपडीधारकांनी आरपीआयच्या कार्यकर्त्यासह तीव्र आंदोलन छेडल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.