राहुलकुमार अवचट
यवत : पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज ता. दौंड येथे ‘आम्ही पोलीस घडवितो’ हे ब्रिदवाक्य असणारे प्रेरणास्थळ साकारण्यात आले आहे. या प्रेरणास्थळ कोनशिलेचे अनावरण व उद्घाटन आ. ॲड. राहुल कुल यांच्या हस्ते पार पडले. प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या संकल्पनेतून तसेच प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांचे श्रमदानातून हे प्रेरणास्थळ साकारण्यात आले आहे.
आजपर्यंत नानवीज ता. दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये २१,५१६ महाराष्ट्रातील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलात प्रथमच चालक, पोलीस शिपाई पदांची भरती घेण्यात आली. त्यातील पहिल्या सत्रातील ६१६ आणि दुसऱ्या सत्रातील ६५८ अशा एकूण १२७४ प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे.
नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे कृतीशील प्रयोगाच्या माध्यमातून तयार झालेला अष्टपैलू पोलीस अधिकारी हा कर्तव्यनिष्ठेने समाजाचे रक्षण करून महाराष्ट्र पोलीस दलाची शान नक्कीच उंचावेल व पोलीसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रिदवाक्याला साजेसे वर्तन ठेवेल, असा विश्वास राहुल कुल यांनी व्यक्त केला. तसेच समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलीसांना घडविणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात भविष्यातही विविध उपक्रमांचे आयोजन केल्यास त्यास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील कुल यांनी दिले.
यावेळी उपप्राचार्य रघुनाथ शिंदे, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस निरीक्षक विरेंद्र चव्हाण, राखीव पोलीस निरीक्षक विकास देवकर , पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणाकरीता महाराष्ट्राच्या विविध घटकातुन आलेले ६५८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.