लोणी काळभोर : येथील विद्यार्थ्यांना कायमच गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने (MIT ADT University) नुकतीच आपली शैक्षणिक कटिबद्दता सिद्ध करताना क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२४(वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग) च्या प्रतिष्ठित कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५०-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळवले आहे.
या यशामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाने जागतिक स्तरावर उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संस्थात्मक कार्यक्षमतेचे महत्त्वपूर्ण मापदंड म्हणून ओळखले जाते, जे शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्यांकन आणि प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण काम करते.
एमआयटी एडीटी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि कार्यकारी संचालिका प्रा.डॉ.सुनिता कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी या शाखांत जागतिक दर्जाचे नाविण्यपूर्ण शिक्षण पुरवत आहे. त्यामुळे विद्यापीठाला या रँकिंगमध्ये स्थान मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसह राज्यभरातून एमआयटी एडीटी विद्यापीठावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुणे एमआटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठ डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे आणि डॉ. अनंत चक्रदेव हे तीन प्र.कुलगुरू तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कष्टांमुळे यशाची विविध शिखरे पादक्रांत करत आहे. त्यात विद्यापीठाला क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये स्थान मिळणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून ती सर्वांच्या कष्टाची पावतीच आहे. या रँकिंगसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या डॉ.विरेंद्र भोजवानी व डॉ.राकेश सिद्धेश्वर यांचेही खूप अभिनंदन!