सोलापूर : महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंदापूर मार्गे बार्शीकडे निघालेल्या बसमध्ये प्रवास करताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली आहे.
रमेश सुब्राव बनसोडे (रा. भीमनगर, धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे. याघटनेबाबत अल्पवयीन मुलीने बार्शी शहर पोलीसात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आई वडिलासोबत गावी जाण्यासाठी बार्शीकडे येणाऱ्या बसमध्ये बसली होती. या बसमध्ये आरोपी अनोळखी युवकही प्रवास करत होता. अल्पवयीन मुलीच्या आई वडिलासोबत बोलू लागला. त्या दरम्यान तो युवक अल्पवयीन मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर संशयित आरोपी त्या अल्पवयीन मुलीजवळ जाऊन बसला व त्याने मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओ अल्पवयीन मुलीला दाखवले. त्यानंतर अश्लील चाळे करू लागला. दरम्यान, पीडिताने घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर ती बस बार्शी पोलीस ठाण्याकडे नेऊन आरोपीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.