मुंबई, ता. 6: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांतून झालेल्या बदनामीप्रकरणी आज गुरुवारी दुपारी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यानुसार सामना दैनिकाचे संपादक खा. संजय राऊत, आ. रोहित पवार आणि लय भारी युट्यूब चॅनेल आणि त्याचे संचालक तुषार खरात या तिघांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. विधानसभा अध्यक्षांनी तो स्वीकारून हक्कभंग समितीकडे पुढील कारवाईसाठी पाठविल्याने या माध्यमांवर आता कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याचे मंत्री जयकुमार गोरेंसंदर्भात काल सामना दैनिकासह अनेक माध्यमांमध्ये बदनामी करण्यात आली होती. ज्या प्रकरणी ही बदनामी झाली, ते जुने असल्याचे सांगून आपल्या आणि आपल्या कुटुंबा विरोधात, तसेच पक्षाविरोधात हा कट केला असल्याने मी हक्कभंग मांडत असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत सांगितले.
दरम्यान मंत्री गोरेंनी हक्कभंग प्रस्ताव मांडल्यावर तो स्वीकृत करून हक्कभंग समितीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यावर काय कारवाई होते त्यावर आता माध्यमांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले मंत्री गोरे
माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ८ दिवसही झाले नाहीत तोच या प्रकारची टिका करण्यात आली. मी सामान्य कुटुंबाचा असून माझ्याविरोधात कट करून हा बदनामीचा प्रकार केल्याचेही मंत्री गोरे यांनी सांगून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही मंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. लय भारी चॅनेलवर माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. मी, माझा पक्ष आणि कुटुंबिय यांच्याविरोधात बदनामी होईल असे वर्तन या युट्यूब चॅनेलने केली, असेही मंत्री गोरे यांनी सांगितले.
या देशात लोकशाही आहे आपल्यासमोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने दिलेल्या निकालाला आता सहा वर्षे झाली आहेत. मात्र सहा वर्षानंतर पुन्हा हा विषय समोर आला आहे.. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे असं मला वाटते, विरोधकांनी एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण करू नये असं गोरे यांनी म्हटलं आहे.
आ.मुनगंटीवार काय म्हणाले
सोशल मीडियाने वातावरण गढूळ केले आहे. यापूर्वी हिंदू दैनिकात अशीच बातमी आली तेव्हा संबंधित संपादकांवर कारवाई करण्यात आली होती. अधिवेशन संपेपर्यंत खरे-खोटे करावे आणि ज्यांनी आरोप केले त्यांना तुम्ही येथे बोलावून त्यांच्याकडे काय पुरावे आहेत? ते मागावे अशीही मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली आहे.
काय आहे प्रकरण
दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवले आहेत. हे प्रकरण त्या महिलेने स्वतः उघड केले आहे. तसेच आपला काहीही संबंध नसताना फक्त बदनाम करण्यासाठी मंत्री गोरे त्रास देत असल्याचे त्या महिलेने म्हटले आहे. याबाबत सदर महिलेने थेट राज्यपालांना पत्र पाठवले आहे. तसेच मंत्रिमंडळातील एक मंत्री त्रास देत असून त्याची हकालपट्टी करावी, असे जयकुमार गोरे यांचे नाव घेत मागणी पत्रातून केली आहे. तसेच महायुती सरकारने याबाबत योग्य ती कारवाई न केल्यास 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा महिलेने दिला आहे.