पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याप्रकरणी ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शनिवारी (ता. १०) संध्याकाळी पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. पोलिसांची सुरक्षा भेदून समता दलाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी थेट पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.
याप्रकरणी आता गृहमंत्रालयाकडून त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याप्रकरणी आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. आता ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याभोवती नेहमीच कडेकोट सुरक्षा असते. मात्र, ही सुरक्षा भेदून समता दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याने एकच खळबळ उडाली होती.
एवढी सुरक्षा असूनही चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत समता दलाचे कार्यकर्ते पोहोचलेच कसे, असा सवाल विचारला जात आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले होते.