युनुस तांबोळी
रांजणगाव (पुणे) : शिरूर तालुक्यातील शिरूर, ताळगाव ढमढेरे, शिक्रापूर, चांडोहसह परिसरात चिऊचा खाऊ अन भाकरीच झाड असेलेले बाजरीचे पिक बहरले असून शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी पाण्यात भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
पावसाच्या हलक्या सरी आणी दाट हिरवळीच्या रानात शेतशिवार फुलली आहेत. बळीराजाने माती आड दडवलेल्या बियाणांनी आता पुन्हा सर्वांची भुक भागवण्य़ासाठी रूप धारण केल आहे. त्यातून खरीपाचे पिक राखणीला आले आहे. शेतशिवारावर पक्षांना हुलकावणी देण्यासाठी बुजगावणी उभी केली आहेत. पण सर्वांच्या अन्नाचा प्रश्नसुटावा म्हणून निसर्गाचे आगळेवेगळे स्वरूप सध्या सगळीकडे शेतशिवारावर पहावयास मिळू लागले आहेत.
खरीप हंगामात विशेषतः बाजरीचे पिक मोठया प्रमाणात घेतले जाते. बाजारात आलेल्या व कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या बियांणाना प्राधान्य देऊन शेतकरी या बियाणांचा वापर करतात. त्यातून शेतीची मशागत करून याकाळात खतांची मात्रा देत वर्षभराची अन्नाची पुर्तता करण्यासाठी शेतकरी काबाडकष्ट करत असतो. कधी दुष्काळ तर कधी निसर्गाच्या आपत्तीमुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र खरीपाच्या या पेरणीने त्यांना वर्षाची अन्नधान्याची गरज पुर्ण होत असते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी भाकरीसाठी तरी बाजरीची पेरणी ही करत असतो.
सध्या शेती तंत्रज्ञानाने विकसीत झाली आहे. त्यातून बाजारपेठेत वेगवेगळी भाजीपाला व बियांणानी जागा घेतली आहे. त्यामुळे कमी कालावधीत पिके घेण्याकडे शेतकरी वळाला आहे. त्यामुऴे भाजीपाल्याची अनेक पिके घेऊन शेतकरी आर्थीक संकटे दुर करताना दिसू लागला आहे. ऊसासारखे नगदी पिक घेत असताना काहि प्रमाणात शेतजमीन रिकामे ठेवून ही पिके घेण्याकडे त्यांचा कल पहावयास मिळतो. मात्र एकत्रीत कुटूंब पद्धती नाहिसी होत गेली त्यातून शेत शिवाराच्या वाटणी होऊन कुटूंबाचे विस्तारीकरण झाले. त्यामुळे एकरात असणारी जमीन ही गुंड्यात वाटली गेली. त्यामुळे बाजरी सारख्या पिकाची पेरणी देखील कमी होत गेल्याचे दिसून येत आहे.
याबाबत शिरूरचे कृषी पर्यवेक्षक ए. बी. जोरी म्हणाले, “गेल्या वर्षी पेक्षा या खरीप हंगामात बाजरीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाचे प्रमाण पहाता व उत्तम हवामानामुळे बाजरीचे पिक देखील जोमात आले आहे. त्यामुळे बाजरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.”
याबाबत चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी म्हतारबा शेलार म्हणाले, “या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. त्यातून अधून मधून येणारा पावसाने पिकाची पाण्याची भरणी होऊ लागली आहे. त्यामुळे खरीपातील पिके देखील जोमाने आली आहेत.”