पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात आता स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे 475 आणि 561 घरांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने सोडत जाहीर केली आहे. विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ५ जिल्ह्यांमधील तब्बल 4777 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी ८ मार्चपासून अर्ज भरता येणार आहेत.
म्हाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. आज तीनवाजल्यापासून हा म्हाडाचा अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १० एप्रिल रोजी रात्री ११:५९ पर्यंत असणार आहे. अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे. म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी लागणार आहे, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
- म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – 2416
- म्हाडाच्या विविध योजना – 18
- म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – 59
- पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – 978
- 20 टक्के योजना पुणे महापालिका 745 आणि पिंपरी-चिंचवड 561 एकूण 4777 सदनिका