राहुलकुमार अवचट / यवत : आमचा गाव आमचा विकास आराखडा अंतर्गत 2025-26 या वर्षाच्या विकास कामांना मंजुरी देण्यासाठी यवत ग्रामपंचायतच्या वतीने आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु १७ सदस्यांपैकी सरपंचासह तीनच सदस्य उपस्थित होते. तर १४ सदस्यांनी सभेला दांडी मारली आहे.
आमचा गाव आमचा विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व गावांमध्ये दोन विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रमाणे गटविकास अधिकारी, दौंड यांच्या आदेशाने यवत ग्रामपंचायतीच्या वतीने देखील २६ व ३१ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु याकडे सदस्यांनीच पाठ फिरवल्याने गावचा विकास होणार कसा? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
२6 डिसेंबर रोजी झालेलया सभेला देखील सरपंच व दोन सदस्य उपस्थित होते. तर इतर दोन सदस्य सही करून निघून गेले. आज सरपंच समीर दोरगे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष ग्रामसभेला देखील फक्त दोनच सदस्य उपस्थित होते. यावेळी कोरम पूर्ण नसली तरी गावातील ग्रामस्थांनी अनेक कामे सुचवली असून यामध्ये वाड्यावस्त्यांवर रस्ते, रस्त्यावर वीज, अंगणवाडी समस्या, स्वच्छता, कचरा यांसह विविध विकास कामे सुचवले असून यातील जास्तीत जास्त विकास कामे करण्याचे आश्वासन सरपंच समीर दोरगे व ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी दिली.
ग्रामसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
ग्रामसभेदरम्यान देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काही दिवसांपूर्वी यवत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाल्याने हे यवत ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या
यवत ग्रामपंचायतच्या अनेक सभा कोरम अभावी तहकूब होत आहेत. तर अनेक सभांना ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने गावाच्या विकासासाठी सरपंच समीर दोरगे यांच्या कडून अधिकाधिक विकास कामे होतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.