उरुळी कांचन (पुणे) : आजच्या तरुणांनी मेमाणे फार्मचा निश्चितच आदर्श घ्यावा…शेती व्यवसाय असो वा व्यापार उद्योग करताना लोकांना काय गरजेचे आहे. किशोर मेमाणे यांचा कमी जागेत चांगल्या नियोजनातून मेमाणे फार्मच्या माध्यमातून पुण्याजवळ आगळीवेगळी सेवा देण्याचा मानस फार काही देणारा आहे. याठिकाणी सर्व सुविधा, व्यवस्था, ग्रामीण भागातील संस्कृतीला धरुन असल्याने प्राचीन संस्कृतीचा आरसा जतन केला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकगीते गायक आनंद शिंदे यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील किशोर मेमाणे यांचे मेमाणे फार्म या ठिकाणी गायक आनंद शिंदे यांचे नवीन गाण्याच्या शूटिंगसाठी दोन दिवस आल्यानंतर माध्यमांनी त्यांचेशी संवाद साधला यावेळी गायक आनंद शिंदे बोलत होते. आनंद शिंदे यांनी १ हजारहून अधिक गाण्यांसोबतच २५० चित्रपटांत पार्श्वगायनसुद्धा केलं आहे. त्यांची भीमगीतंसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.
यावेळी दिग्दर्शक प्रकाश धिंडले, माया शर्मा, धनश्री कांबळे, टी सीरीझ कंपनीचे सर्व सहकारी, मेमाणे फार्मचे किशोर मेमाणे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, हवेली तालुका पत्रकार संघाचे विजय तुपे, अमोल भोसले, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “कोरोना परिस्थितीनंतर उद्योग, व्यवसाय स्थिरस्थावर होण्यास अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात हॉटेलींग, पर्यटन केंद्रात व्यवसाय उभारणीस चांगला वाव निर्माण झाला आहे. व्यवसाय करताना ग्राहकांचे हित प्राधान्याने पूर्ण केल्यास यश निश्चित मिळते. मेमाणे फार्म हे हजारो वर्ष असेच राहणार आहे. या ठिकाणी येऊन माझ्या मनाला खूप मोठे समाधान वाटले तसेच या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला ही वास्तू आवडेलच असा ठाम विश्वास आहे.”
दरम्यान, मेमाणे फार्म या कृषी पर्यटन केंद्राचा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे अवर्जून ठिकठीकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमात उल्लेख करतात. या पर्यटन केंद्राचे मालक किशोर मेमाणे यांनी केंद्रात निर्माण केलेले नैसर्गिक स्वरुप, सेंद्रिय शेती, पशुप्राणी व जेवणाचा बेत आदी सुविधां विषयी वारंवार उल्लेख करतात.