दीपक खिलारे
इंदापूर : राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या सुमारे नव्वद टक्के जमिनीचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना जमीन वाटपाच्या अडचणी संदर्भात व खंडकरी शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समवेत मंत्रालयात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध अडचणी संदर्भात हर्षवर्धन पाटील यांना ( दि.२) निवेदन देऊन अडचणींमधून मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी खंडकरी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.
खंडगिरी शेतकऱ्यांना जमिनी परत करताना त्यावर वर्ग २ चा शेरा मारला जातो त्यामुळे अडचणी येत आहेत तरी वर्ग १ चा शेरा करावा, शेती महामंडळाने काढलेले जमिनी या नापिक व खडकाळ असल्याने शेती पिकांसाठी योग्य नसल्याने त्या जमिनी बदलून मिळाव्यात, जर एखाद्या शेतकऱ्याचे क्षेत्र १ एकर पेक्षा कमी असेल तर त्यांना पूर्ण एक एकर जमीन मिळावी, जमिनीसाठी अर्ज मुदत दि.१/५/१२ होती.
मात्र, त्यानंतरही आलेल्या अर्जाचा विचार व्हावा, मिळणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांना त्यांच्या राहत्या गावात मिळाव्यात, आकारी पडित जमिनी हरेगाव मळा श्रीरामपूर येथील जमिनी त्या मूळ खंडगिरी शेतकऱ्यांना परत करण्यात याव्यात, आदी मागण्या सदर निवेदनाद्वारे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे करण्यात आले आहेत.
या सर्व मागण्या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. डी. पाटील, अण्णासाहेब पाटील (श्रीरामपूर), गंगाधर पाटील (कोपरगाव), रावसाहेब काकडे व भाऊसाहेब काकडे (श्रीगोंदा), विजय खटके व शशिकांत देशमुख (श्रीपुर), जगनाथ वाघमोडे (सदाशिवनगर ) तसेच इंदापूर तालुक्यातील बाळासाहेब डोंबाळे-पाटील, प्रदीप पाटील, सुहास वाघ, अशोक शहा, अनिल शिराळ, चंद्रकांत सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील खंडकरी शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे सन १९९५ ला मंत्रीपद मिळालेपासून खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून देणेसाठी सातत्याने मोलाचे प्रदीर्घ काळापासून सहकार्य लाभत आहे. राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना जमीनी परत मिळणेमध्ये सतत येणाऱ्या बिकट अडचणी या हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून दूर केल्या, त्यामुळे खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळू शकल्या.
आजही तब्बल २७ वर्षे झाली यासंदर्भात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा कायम असल्याचे खंडकरी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.