नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरातील एका अॅल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्फोटात 11 जण गंभीर जखमी झाले असून जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागुपरातील उमरेड एमआयडीसीत एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार केली जाते. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. १५० कामगार काम करत होते. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. स्फोटामुळे येथे काम करणाऱ्या काही कामगारांचे कपडे अंगावरच जळाले. स्फोटानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतली. त्यामुळे अनेकांचे जीव असले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
दरम्यान कंपनीतील हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटानंतर निर्माण झालेले धुरांचे लोळ एक किलोमीटरपर्यंत दिसत होते. दरम्यान यातील जखमीवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.