पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तडकाफडकी बदलीची मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत 4 अधिकारी आणि 11 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.यामुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांच्या एका कारवाईदरम्यान अल्पवयीन मुलांना पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढण्यात आली होती. या घटनेचे व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. राज्य मानवाधिकार आयोगाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेतली. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर, सदस्या न्यायमूर्ती स्वप्ना जोशी आणि सदस्य संजयकुमार यांच्या पीठाने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. यानंतर लगेचच पोलीस आयुक्तांनी दोषींवर प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले.

मानवाधिकार आयोगाच्या भूमिकेनंतर या प्रकरणात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांची विशेष शाखेत, तर कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.

विशेष शाखेत बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे:
सहायक पोलीस निरीक्षक – स्नेहल संभाजी थोरात
पोलीस उपनिरीक्षक – नीलेश राजेंद्र मोकाशी
पोलीस उपनिरीक्षक – अण्णा मधुकर दराडे
पोलीस उपनिरीक्षक – सद्दाम हुसेन दस्तगीर फकीर
तसेच पोलीस मुख्यालयात बदली करून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे:
पोलीस हवालदार – सुनिल दादा हनवते
पोलीस हवालदार – दिनेश विनायक तापके
पोलीस अंमलदार – मितेश दत्तात्रय चोरमले
पोलीस अंमलदार – सागर चंद्रकांत बोरगे
पोलीस अंमलदार – सोहम कैलास शेंडकर
पोलीस अंमलदार – मंगेश जयसिंग पवार
पोलीस अंमलदार – राहुल अशोक औंधकर
पोलीस अंमलदार – रवींद्र शंकर गायकवाड
पोलीस अंमलदार – संदिप लक्ष्मण आगळे
पोलीस अंमलदार – तुकाराम पंडित सुतार
पोलीस अंमलदार – सुवर्णा दत्तात्रय भिसे
पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे खाकी वर्दीतील बेजबाबदार वर्तनाला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







