पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. तिने आपल्या पहिल्या पतीचे निधन झाले, असे सांगून तिने एका मौलानांशी दुसरा विवाह केला. त्यानंतर वर्षभरात त्याच्याकडील सोने, नाणे, गाडी, घर असे सर्व बळकावुन तिने दुसऱ्या व्यक्तीशी तिसरा विवाह करुन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ ऑगस्ट २०२३ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत कोंढवा परिसरात घडली आहे.
या प्रकरणी कोंढवा येथील एका ५९ वर्षीय मौलाना यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आलीया नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका मदरसामध्ये मौलाना म्हणून आहेत. आरोपी महिलेने त्यांना आपल्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे, असे खोटे सांगितले. आर्थिक फसवणुकीच्या हेतूने तिने त्यांच्याशी लग्न केले. आरोपी महिला पुणे आणि पालघर येथे जाऊन येऊन रहात होती.
दरम्यान, या वर्षभरात फिर्यादी यांच्याकडून तिने वेळोवेळी सोने, रोख रक्कम, गाडी, घर असा एकूण तब्बल १४ लाख रुपयांचा ऐवज घेतला. त्यानंतर त्यांनी दुसर्याशीच तिसरे लग्न केले. याचा फिर्यादी यांनी तिला जाब विचारला असता, त्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाली ही बाब मौलाना यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक थोरात करीत आहेत.