दीपक खिलारे
इंदापूर : महिला वकील व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने (दि.३) रोजी जंक्शन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जंक्शन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
अॅड.सोनाली भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांना (दि.१ ) डिसेंबर रोजी मारहाण करीत हल्ला करण्यात आला. या घटनेप्रकरणी हल्ल्यातील आरोपीवर भा.द.वी. ३०७, ३२६, ३५४ ब ही वाढीव कलमे लावावीत, कायदेशीर कडक कारवाई करावी व आरोपीच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास पुणे जिल्हा अधीक्षक पुणे ग्रामीण पुणे मुख्यालय, याठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा यावेळी इंदापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.
या निषेध मोर्चास इंदापूर तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.