Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून आनंदाची बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य शासनाच्या आदेशावरून विविध विभागाने मराठवाड्यात त्यांच्याकडे असलेल्या जवळपास जुन्या 2 कोटी कागदपत्रांची तपासणी केल्या आहेत. अजूनही कुणबी कागदपत्रांची तपासनी सुरू आहे. आत्तापर्यंत यामध्ये 27 हजार 534 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक 13 हजार 128 नोंदी एकट्या बीड जिल्ह्यात आढळून आल्या आहेत. तपासणीत आढळलेल्या नोंदीचा सविस्तर अंतिम अहवाल शिंदे समितीकडे सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी या नोंदी महत्वाच्या ठरणाऱ्या असल्याचे समजलं जात आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी आढळल्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये 24,47,887 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 1,278 नोंदी आढळल्या आहेत. जालन्यात 21,60,615 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 3318 नोंदी आढळल्या. परभणीत 21,19,994 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 2,891 नोंदी आढळल्या. हिंगोलीत 12,62,219 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 3,468 नोंदी आढळल्या आहेत. नांदेडमध्ये 25,68,942 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 1,204 नोंदी आढळल्या आहेत. बीडमध्ये 23, 81,553 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 13,128 नोंदी आढळल्या आहेत. लातूरमध्ये 22,64,493 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 809 नोंदी आढळल्या आहेत. धाराशिवमध्ये 41,85,029 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 1,438 नोंदी आढळल्या आहेत.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही : गिरीश महाजन
भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचे म्हटले आहे. महाजन म्हणाले की, “मराठा आरक्षण प्रकरणी सरकार गंभीर आहे. य संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहे. मनोज जरांगेंचीची सरसकट प्रमाणपत्र मिळावे ही मागणी शक्य नाही. मी स्वत: ज्यावेळी त्यांच्या भेटीसाठी गेलो त्यावेळी मी त्यांना या संदर्भात सांगितले आहे. आतापर्यंत जेवढ्या कुणबी नोंदी मिळल्या त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे.