मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी 25 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथून निर्णायक संघर्षाची घोषणा करत 29 ऑगस्टपासून तीव्र आमरण उपोषणाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आंदोलनाच्या तयारीस सुरुवात केली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या घटनेकडे लागले आहे.

‘चलो मुंबई’चा थेट इशारा आणि आक्रमक भूमिका आरक्षणाच्या अंमलबजावणीत टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत जरांगेंनी आंदोलकांना मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. “आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाल्यास ते सरकारलाच महागात पडेल,” असा सज्जड इशारा देत त्यांनी यावेळी आझाद मैदानाऐवजी थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शासकीय धोरणांवर कडक टीका करताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला नाहक त्रास देत असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.कुणबी नोंदी रद्द करण्याच्या प्रशासकीय कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत ते म्हणाले, “मराठ्यांच्या मुला बाळांचे नुकसान करणाऱ्या मंत्र्यांनी नेत्यांचे ऐकून चुकीची पावले उचलू नयेत.” हा मराठा आरक्षणाचा शेवटचा आणि निर्णायक लढा असल्याने सर्व बांधवांनी एकजुटीने यात उतरावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

महायुती सरकारचे प्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी अंतरवालीत जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तोडगा अयशस्वी ठरला. आता उपोषणाची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने सरकार जरांगेंचे मन वळवण्यात यशस्वी होणार की मराठा आंदोलक पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.







