बुलढाणा : जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर गावाजवळ एक भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. मद्यधुंद बोलेरो चालकाने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या दुर्दैवी घटनेत 5 वर्षांच्या निष्पाप बालकाचा जागीच छिन्नविछिन्न होऊन मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या त्याच्या आईने रुग्णालयात नेताना वाटेतच प्राण गमावले.

अपघाताच्या वेळी दुचाकीवर एक महिला आणि तिची दोन मुले प्रवास करत होती. भरधाव आणि अनियंत्रित बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिल्याने हा थरकाप उडवणारा अपघात घडला. यामध्ये दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती पसरताच लाडनापूर परिसरातील ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या मद्यधुंद चालकाच्या कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. संतप्त जमावाने अपघातग्रस्त बोलेरो गाडीला जाळून खाक केले.

एवढेच नाही तर, जखमी अवस्थेतील आरोपी चालकाला वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरही काही लोकांनी दगडफेक करत तोडफोड केली. दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या आरोपीला थेट आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठा गोंधळ घातला.
घटनेचे गांभीर्य ओळखून सोनाळा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत संतप्त जमावाला शांत केले आणि आरोपी चालकाला सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे परिसरातील तणाव नियंत्रणात आला.
याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. निष्पाप आई आणि मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







