छ.संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले होते. १३ जून रोजी मंत्री शंभूराज देसाई यांनी भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छ.संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता मनोज जरांगे यांची तब्येत स्थिर असून तब्येतीत सुधारणा होत आहे. अशी माहिती डॉ. विनोद चावरे यांनी दिली.
डॉ.चावरे पुढे बोलताना म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना आणखी काही दिवस उपचाराची गरज आहे. सहा दिवसाच्या आमरण उपोषणामुळे तब्यत खूपच बिगडली होती. किडनीवर सूज येणे, लिव्हरवर सूज येणे, हायपो टेन्शन असे आजार होते, त्यामध्ये आता हळूहळू सुधारणा होत आहे. जरांगे पाटील यांचे जवळजवळ नऊ ते दहा किलो वजन कमी झाले आहे. त्यामुळे सुधारणा होण्यासाठी कमीत कमी दोन आठवड्याचा कालावधी लागेल, असे डॉ. विनोद चावरे यांनी यावेळी सांगितले.
तर नाव घेऊन उमेदवार पाडू : मनोज जरांगे
मंत्री शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. त्यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. तसेच १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.