भोर (पुणे) : ‘मराठा आरक्षण घेणारच आणि तेही ओबीसीमधूनच. सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेऊ,’ असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी भोर येथील शेटे मैदानावरील सभेत बोलताना व्यक्त केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुणबी दाखले मिळत असल्याने मराठा आरक्षण हे निश्चित मिळेल. परंतु काही दुष्ट प्रवृत्या ओबीसी व मराठा समाजात भांडणे लावून दंगली भडकविण्याचे काम करीत आहेत.त्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका. एक डिसेंबर पासून गावागावत साखळी उपोषणे सुरु करून सरकारला निवेदने देऊन दबाव निर्माण करा, असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
’24 डिसेंबरला आरक्षण देण्याचा सरकारचा शब्द आहे. तोपर्यंत मराठ्यांची कसोटी आहे. गाफील राहिलात तर तुमच्या लेकरांच्या वाटोळ्याला तुम्हीच स्वतः जबाबदार असाल,’ अशा शब्दांत जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना सावध राहण्याचे, तसेच प्रचंड ताकदीने एकत्र येण्याचे आवाहन केले. ‘आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीला नोंदी शोधण्यास सांगितले होते. राज्यभर लाखो नोंदी सापडल्या आहेत. या नोंदींचा अहवाल तयार करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे आहे,’ असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भोर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भोर येथील शेटे मैदान येथे आयोजित मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेला मोठी गर्दी होती. यावेळी जरांगे पुढे म्हणाले, मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी, तरुणांना शिक्षण क्षेत्रात, नोकरी, व्यवसायात योग्य संधी प्राप्त व्हावी यासाठी मराठा आरक्षणाची नितांत गरज आहे.
मराठ्यांना कोणाच्याही वाट्याचे आरक्षण नको आहे, तर हक्काचे आरक्षण हवे आहे. समाजाला गेल्या ७० वर्षांपासून स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पुढाऱ्यांनी आरक्षणापासून दूर ठेवले आहे. आताही आरक्षणाच्या प्रश्नांवरून समाजाला अडविण्याचा प्रयत्न होत आहे. आजपर्यंत समाजाच्या पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या आहेत. किमान आत्ताच्या आणि पुढच्या पिढीला तरी लाभ व्हावा यासाठी आरक्षणाचा लढा तीव्र करीत आहोत.
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आरपारची लढाई संपूर्ण राज्यात चालू आहे. पुराव्यांचा प्रश्न निर्माण करणारे कुणबी मराठा हा पुरावा मिळायला लागल्याने ओबीसी समाजाला हाताशी धरून आरक्षण विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयत्न मराठा सामाजाने हाणून पाडायचा आहे.
राज्य शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल त्याशिवाय हा लढा थांबणार नसून आरक्षण मिळाल्यानंतरच स्वतःच्या घरात पाऊल ठेवणार आहे. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी अनेक टोळ्या समोर येत आहेत. महराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी समिती स्थापन करून कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु केले आहे, लाखो नोंदी सापडल्या असून शासनाला मराठा समाजाल आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही. भोर तालुक्यातील मराठा समाजाने शांततेत आंदोलन करायचे आहे. आंदोलनाला गालबोट लागू देवू नका असेही आवाहन जरांगे- पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मराठा बांधवांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. भोर सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांचे तलवार, पुष्प गुच्छ व प्रतिमा देवून स्वागत करण्यात आले.
भोर शहरात भगवेमय वातावरण
भोर तालुक्यातील मराठा समाज सभेसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगवे फलक लावल्याने भोर शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. अबाल वृद्धांपासून सर्वांचीच सभेला उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. भोर येथील शेटे मैदान या ठिकाणी व्यासपीठ तयार करण्यात आले होते. भोर तालुक्यातील अनेक संघटनांच्या कार्यकत्यांनी जरांगे पाटील यांच्या सभेला हजेरी लावली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एक डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषण सुरु करण्याचा निर्धार केला आहे.
ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही!
जरांगे पाटील ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाल आरक्षण मिळावे या साठी आग्रही आहेत. असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयन्त जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. परंतु ओबीसी समाजाच्या सर्वसामान्य लोकांचा या आरक्षणाला कसलाही विरोध नाही, जागोजागी मराठा बांधवांबरोबर ओबीसी समाजातील तरुण सुध्दा स्वागताला पुढे येत आहेत. छगन भुजबळांसारखे काही नेते जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर वक्तव्य करून दोन समाजात वितुष्ठ आणण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका त्यांनी केली.
भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. यावेळी हजारो मराठा बांधव उपस्थित होते. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणांनी यावेळी आसमंत दनानत होता. यावेळी सर्वानी भगव्या टोप्या घातल्या होत्या तसेच ठीक ठिकाणी भगवे ध्वज लावल्यामुळे वातावरण भगवे झाले होते. मराठा मोर्चा प्रमाणेच सभेचेही सुयोग्य नियोजना मुळे ही महासभा यशस्वीरित्या संपन्न झाली.