आंतरवाली सराटी (जालना) : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी बिघडली आहे. गुरुवारी सकाळपासून त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. पोटदुखीच्या वेदनांनी ते व्हिवळत आहेत. त्यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.
उपोषणामुळे बुधवारी मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली. औषधे देण्यात आली. उपोषणस्थळी जरांगेंना पाणी घेण्याचा आग्रह नागरिक करत आहेत. ‘पाणी घ्या’ म्हणत उपस्थितांची घोषणाबाजी सुरु आहे.
जरांगे पाटील पोटदुखीने त्रस्त
जरांगे पाटलांची प्रकृती बिघडत चालल्याने उपोषणस्थळी महिलांची रडारड सुरु आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे. अधिसूचनेच कायद्यात रुपांतर झाले पाहिजे या भूमिकेवर ते ठाम आहेत. बुधवारी त्यांना सलाईन लाऊन, इंजेक्शन आणि औषधेही देण्यात आली. पण, त्यांनी सलाईन काढली. जरांगे पाटील पोटाला धरून व्हिवळताना दिसत होते.
जरांगे भूमिकेवर ठाम
मनोज जरांगेंची भूमिका ठाम आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि अधिसूचनेचे रुपांतर कायद्यात व्हावे, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा सलग सहावा दिवस असल्याने जरांगेंना पोटदुखीचा त्रास होत आहे.
सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार
सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मागणी पूर्ण झाली नाही, तर मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे. सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार आणि तसं नाही झालं तर, उपोषण करतच मुंबईत घुसणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.