जालना : चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं? त्यांना काय कळतं. फक्त “तेरे नाम भांग पाडून फिरत असतात”, स्वतःची ३७ मतं तरी त्यांना पडतात का? असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात बीड आणि जालना या ठिकाणी सोमवारी मतदान पार पडतं आहे. मनोज जरांगे पाटील लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सभेला ६ कोटी मराठा बांधव येणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
राज्यातील अकरा मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. त्यामध्ये बीड मतदारसंघाचाही समावेश आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना हाक दिली आहे. ते म्हणाले, ८ जून रोजी नारायण गड येथे भव्य सभा घेणार आहे. १५ मे रोजी त्या सभेनिमित्त सभास्थळाची पाहणी करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, सभास्थळाच्या पाहणीनंतर सभेबाबतचा अंतिम निर्णय मी घेणार आहे, असं ते म्हणाले.
तसंच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे पाटलांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का? त्यांना काय कळतं. फक्त तेरे नाम भांग पाडून फिरत असतात, स्वतःची ३७ मतं तरी त्यांना पडतात का? अशी टीका त्यांनी चंद्रकांत पाटलांवर केली.
पंकजा मुंडे जातीचं राजकारण करत आहेत : मनोज जरांगे
पंकजा मुंडे यांना पाडा असं मी कुठेच बोललो नाही. उलट त्या जातीयवादी राजकारण करत आहेत. भरसभेत त्या म्हणतात आता ओबीसींनी एक होण्याची गरज आहे. त्याचवेळी स्टेजवर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणे गरजेचे होतं. मात्र, त्यांनी आक्षेप घेतला नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे, असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला.