पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती, ता.शिरुर येथे महागणपतीच्या दर्शनासाठी आज नव वर्षानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर व उपाध्यक्ष संदीप दौडकर यांनी दिली. आज पहाटे ५ वाजता श्रीं चा अभिषेक व महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी १२ वाजता मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते आणि देवस्थानचे सचिव तुषार पाचुंदकर यांच्या उपस्थितीत महापुजा संपन्न झाली.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे येऊन नव्या वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा दोन तीन पिढ्यांपासून कायम ठेवणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. यंदाही हे चित्र ठळकपणे नजरेत भरत होते. नव वर्षाची सुरुवात महागणपतीच्या दर्शनाने करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालय यांच्या शैक्षणिक सहली, रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे कामगार, अधिकारी आणि कोरेगाव भिमा येथे शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादनासाठी जात असलेले अनुयायी यांनी दर्शनासाठी मोठया प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
सकाळी नाशिकचे पोलिस अधीक्षक आदित्य मिरघेकर यांनी सपत्नीक अभिषेक करत महागणपतीचे दर्शन घेतले. तसेच आज दिवसभरात हजारो भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे रांजणगावला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.