पुणे : नशा करताना झालेल्या वादाचे पर्यवसान थेट मित्राच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली. नशेच्या अंमलात असलेल्या एकाने मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याचा खून केला. या घटनेनंतर आरोपी घरी गेला, कपडे बदलले आणि त्यानंतर स्वतःहून खडक पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आकाश ऊर्फ अक्क्या ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय-30, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजय ऊर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (वय-30, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रुपाली प्रमोद पाटोळे (वय-30) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपाली पाटोळे या भवानी पेठेतील जुना मोटार स्टँड परिसरात शेंगा आणि कणीस विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी (ता. 02) सायंकाळी त्यांचे दीर आकाश हे घरी झोपले होते. सायंकाळी झोपेतून उठल्यानंतर आंघोळ करून ते घरात बसले होते. त्याचवेळी त्यांचे मित्र शंभू आणि अबिद हे घरी आले. त्यांच्यासोबत आकाश बाहेर पडले.

दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास काशेवाडी परिसरातील वजनकाट्याजवळील एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. परिसरातील एका व्यक्तीने याबाबत रुपाली यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता आकाश गंभीर जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आकाशच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी रुपाली खडक पोलीस ठाण्यात गेल्या असता, त्याचवेळी आकाशचा मित्र अजय ऊर्फ चोर राजा हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. नशा करताना झालेल्या वादातून आकाशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे समजते. खून केल्यानंतर तो घरी गेला, कपडे बदलले आणि त्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव करीत आहेत.







