लोणी (ता.आंबेगाव) : आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील रहिवासी असलेले संदीप दत्तात्रय पोपळघट (वय-५२ वर्षे ) यांचे अपघाती निधन झाले. त्यांची अठरा वर्षीय मुलगी ऋतूजा पोपळघट ही या अपघातात जखमी झाली आहे. पोपळघट यांची मोठी मुलगी अक्षदा हिचा विवाह सोहळा शनिवार ३० मार्च रोजी दुपारी तीन वाजता थापेवाडी येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला. हा विवाह झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर लग्न झालेल्या मुलीची पाठराखण करण्यासाठी धाकटी मुलगी ऋतुजाला पाठवायचे होते. म्हणून ऋतुजा वडील संदीप पोपळघट यांच्यासोबत लोणी येथील घरी कपड्याची बॅग आणण्यासाठी लोणीच्या दिशेने जात होती. त्यानंतर बांधनवस्ती या ठिकाणी आले असता गतिरोधक आला म्हणून दूचाकीचा वेग पोपळघट यांनी कमी केला. त्याचवेळी पाठीमागून जोरात येणाऱ्या टेम्पोने जोरात दोघांना जोरात धडक दिली. या धडकेत संदिप पोपळघट हे डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर पोपळघट यांना प्रथम लोणी व नंतर चाकण या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुलगी ऋतूजाचा एक पाय फॅक्चर झाला असून दुसऱ्या पायाला मोठी दुखापत झाली. दरम्यान संदीप पोपळघट यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचे रविवार ३१ मार्च रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.