पुणे: पोलीस कारवाईच्या भीतीने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बांधकाम ठेकेदाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात ही घटना घडली आहे. विश्वनाथ गुंडाप्पा बिरेदार (वय ४७, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बेकायदा धंदे आणि सराइताविरुद्ध कारवाईची मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) हाती घेतली. चरवड वस्ती भागातील एका इमारतीत काही जण पत्ते खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी इमारतीच्या परिसरातील काही जणांची चौकशी सुरू केली. त्या वेळी इमारतीच्या परिसरातील एक जण ‘पोलीस आले’ असे ओरडला. त्यानंतर पोलिसांनी इमारतीकडे धाव घेतली. इमारतीत पोलीस पोहोचले तेव्हा दोघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी इमारतीत सहा ते सात जण होते. एक जण इमारतीतील पाइप पकडून खाली उतरला. बिरेदारही पाइप धरून उतरण्याचा प्रयत्नात होता. चौथ्या मजल्यावरून बिरादार खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.