संगमनेर : पिंपरणे-कोळवाडे रस्त्यावर कोळवाडे शिवारामध्ये बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाला. पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सूचना फलक, बॅरिकेड न लावल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. राघू गजबा कडनर (वय 55, रा. अंभोरे, ता. संगमनेर, जि. नगर) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
राघू कडनर आपल्या दुचाकीवरून कोळवाडी शिवारातून रात्री जात असताना अंधारात त्यांना खड्डा दिसला नाही. दुचाकीसह पडून ते गंभीररित्या जखमी झाले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, अपघाताच्या दुसऱ्या दिवशी याची माहिती समजली. या रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांनी पाहिल्यानंतर पोलीस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, अंभोरे ते कोळवडे रस्त्यावर ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथे दोन्ही बाजूंनी सूचना फलक, बॅरिकेड लावणे गरजेचे आहे. संबंधित ठेकेदाराने यात हलगर्जीपणा केल्यामुळे राघू कडनर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.