नारायणगाव: पिंपळवंडी (वाघपट्टा) येथील शेतकरी नवनाथ गेनभाऊ वाघ (वय ५६) यांचा कॅनॉलमध्ये पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी शैला, मुलगा प्रदिप व आई सगुणाबाई व दोन भाऊ असा परिवार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ३० डिसेंबर रोजी पिंपळवंडी येथे शेतकरी नवनाथ वाघ सायंकाळी ७.३० वाजता कुकडी कॅनॉलवर असलेली इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी गेले असता पाय घसरुन कॅनॉलमध्ये पडले.
कॅनॉलच्या पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे पाण्यात पडले. रात्र झाल्यामुळे शोध घेऊनही ते सापडू शकले नाहीत. २ ते ३ दिवस शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. ३ जानेवारीला पारनेर पोलीस स्टेशन येथून आळेफाटा पोलीस स्टेशनला एक मृतदेह कुकडी कालव्यातून मिळाल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वाघ कुटुंबिय लोणी मावळा (चासकरवाडी) येथे मृतदेह पाहण्यासाठी गेले असताना तो मृतदेह हा नवनाथ वाघ यांचाच असल्याची खात्री झाली. या घटनेमुळे पिपळवंडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.