यवतमाळ : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीला मद्यपीने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याला नालीत पाडले. त्यामध्ये संबंधित व्यक्तीच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना २६ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता बाभूळगाव येथे घडली. अर्जुन रामभाऊ पुसनाके (४०, रा. वैजापूर) असे या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे, तर सुधाकर सदाशिव एकरे (४०, रा. चेंडकापूर) असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. बाभूळगाव येथील पानटपरीवर अर्जुन पुसनाके २६ डिसेंबरला सकाळी उभा होता.
यावेळी आरोपी सुधाकर तिथे आला. त्याने अर्जुनला दारू पिण्याकरिता पैसे मागितले. त्याने सुधाकरला पैसे देण्यास नकार दिला. त्यावर संतप्त सुधाकरने अर्जुनला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याला नालीत पाडून पुन्हा मारहाण केली. या मारहणीत त्याच्या हातापायाला आणि करंगळीला गंभीर दुखापत झाली. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अर्जुनची त्याच्या तावडीतून सुटका केली. उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. उपचार आटोपताच अर्जुनने बाभूळगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी सुधाकर एकरेविरुद्ध भा.न्या.सं. ११७ (२), ३२४(४), ३५२, ३५१(२) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.