यवतमाळ : शिवीगाळ करण्यास मनाई केल्यावरून झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावावर विटेने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना ५ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता पांढरकवडा तालुक्यातील बोथ येथे घडली.
वसंत जेवंतराव भनारकर (३५, रा. बोथ) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ५ जानेवारीला सायंकाळी तो नेहमीप्रमाणे घरी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहत होता. यादरम्यान त्याचा मोठा भाऊ बोदाराम जेवंतराव भनारकर (४०) तेथे आला. मद्यधुंदीत त्याने जोरजोराने आरडाओरड करीत शिवीगाळ केली. शिवीगाळ ऐकून वसंत घराबाहेर आला. त्याने भाऊ बोदारामची समजूत घालून त्याला शिवीगाळ करण्यास मज्जाव केला. त्यावर संतप्त झालेल्या आरोपी बोदारामने वसंतवर विटेने हल्ला केला.
या हल्ल्यात वसंतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय धावले. त्यांनी वसंतची त्याच्या तावडीतून सुटका केली. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचार आटोपताच त्याने पांढरकवडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी बोदारामविरुद्ध भा.न्या.सं. ११८ (१), ३५२, ३५१ (२) (३) कलमान्वये गुन्हा दाखल केला.